गेवराई दि.18 – तालुक्यातील गुळज भगवान नगर येथे कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी घडली. बुधवारी रात्री उशिरा एकाचा मृतदेह सापडला असुन एकाचा शोध सुरु आहे.
गुळज भगवान नगर येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेले दोन शाळकरी विद्यार्थी दि.१७ मार्च बुधवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास येथुन जवळच असलेल्या पैठण उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. शेख अरबाज (13) रा. पैठण व शेख नाशिर (12) रा. रामपुरी अशी त्यांची नावे आहेत. सदरील दोन्ही मुले वाहत्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली.
सदर घटना घडल्यापासुन नातेवाईक त्यांचा शोध घेत असुन बीड येथील शोध पथकाच्या मदतीने रात्री उशीरा शेख अरबाजचा मृतदेह सापडला आहे. उमापुर पोलीसात घटनेची माहिती देण्यात आली.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. रात्री १० वाजता तळणेवाडी येथील सीआर चार वरील गेट वर येऊन नातेवाईक शेख नाशेर याचा शोध घेत होते मात्र रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.