केज दि.१८ तालुक्यातील एकुरका येथे पोलिसांनी आज टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे
अधिक माहिती अशी की, दि. १८ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील एकुरका शिवारातील गट नंबर ५० मध्ये घरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळाल्या वरून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे बाळासाहेब अहंकारे, सिद्धार्थ डोईफोडे आणि अशोक नामदास यांच्या पथकाने छापा टाकून देशी दारू विक्री करत असलेला अरुण ज्ञानोबा कोकाटे वय याला बॉबी संत्रा देशी दारुच्या २४१ बाटल्यासह ज्याची किंमत ६ हजार २६६ रु. आहे असा मुद्देमाल ताब्यात घेतले.
पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास हे करीत आहेत.
दोन ट्रक वाळू पकडली, चोवीस तासानंतर पंचनामा
केज दि.१८ – तालुक्यातून उस्मानाबाद जिल्हा कडे जाणाऱ्या वाळूच्या दोन ट्रक वाहतूक शाखेने ताब्यात घेतले असून त्यातील गौण खनिजाच्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी तहसील कार्यालयाला कळविले आहे.
दि. १७ मार्च रोजी दुपारी १ वा. च्या दरम्यान केज येथील धारूर रोड, जय भवानी चौकातून वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक क्र.
(एमएच-४५/टी-६७६४) व
(एमएच -१२/एफझेड-७५३६) या मधून वाळूची वाहतूक होत असून त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबकडे जात असल्याची गुप्त माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. त्या नुसार वाहतूक शाखेचे हनुमंत चादर यांनी सापळा लावून सदरील दोन्ही गाड्या अडवून त्या पोलिस स्टेशनला आणल्या. संबंधित वाळू वाहतूक करणाऱ्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना होता; परंतु त्यात परवानगी पेक्षा जास्त वाळू वाहतूक करीत असल्याचा संशय आल्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरणी केज तहसीलदारांना पत्र देऊन गौण खनिज संदर्भात सदर गाड्यातील वाळू साठ्याचे मोजमाप करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी तहसीलच्या गौण खनिज विभागाला कळविले आहे. त्यानुसार तब्बल चोवीस तास उलटून गेल्या नंतर केज तहसीलचे मंडळाधिकारी भागवत पवार यांनी सदर गाड्यांचा पंचनामा करून त्यातील वाळू साठ्याचे पंचासमक्ष मोजमाप केले. त्याचा अहवाल वरिष्ठांना दिलेला आहे. त्यानुसार पुढे यावर काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.