महाराष्ट्रात नवीन गाईडलाईन्स जाहीर…….!
मुंबई दि.१९ – महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच महाराष्ट्र हे लॉकडाउनच्या जवळ असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच जनतेकडून त्यांनी सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली. राज्य सरकारतर्फे आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील खाजगी कार्यालय व आस्थापनांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी संख्या उपस्थित ठेवता येणार नाही. यामधून आरोग्य, अत्यावश्यक सेवा व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं आहे. राज्यातील सर्व नाट्यगृह आणि सांस्कृतिक सभागृहामधील उपस्थिती 50 टक्के करण्यात आली आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुखांनी कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांची उपस्थिती निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात धार्मिक सामाजिक राजकीय तसेच सांस्कृतिक मेळावे किंवा सभेसाठी नव्या नियमावलीनुसार गर्दी करता येणार नाही. याव्यतिरिक्त नाट्यगृह आणि सभागृहाचा वापर धार्मिक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक सभांसाठी करण्यास पूर्णतः बंदी असणार आहे.
दरम्यान गुरुवारी एका दिवसात तब्बल 25 हजार 833 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच 58 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत चालल्याचं दिसून येतंय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे.