तर लॉक डाउन बाबत निर्णय घ्यावा लागेल – ना.राजेश टोपे
पुणे दि.२२ – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. काही दिवस दिले जातील. लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केलंय. अजून 2-4 दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.