#Judgement
शासकीय कामात अडथळा, एक वर्षाचा साधा कारावास……..!
केज दि.२४ – शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकास एक वर्ष साधा कारावास व १,०००/- रुपये दंडाची शिक्षा मा.अपर सत्र न्यायालय ४थे, अंबाजोगाई श्री एस. के. चौदंते यांनी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आवसगाव येथील जि. प.प्रा. शाळेतील अजय मधुकरराव काळे या शिक्षकाने युसूफवडगाव पोलिसांत फिर्याद दिली होती की, दि.25/07/2014 रोजी सकाळी 11.00 वा. जि.प.प्रा. शा.आवसगाव येथे पालक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. सदर पालक मेळावा चालू असतांना आवसगाव येथील दत्ता अभिमान्यू शिनगारे हा तेथे आला व मला म्हणाला की, तु शाळेच्या बांधकामात भ्रष्टाचार केलास, तुला पालकांना शाळेत बोलावण्याचा काय अधिकारी आहे? तु बांधकामाचा हिशोब मला दे, असे म्हणून मला शिवीगाळ केली व गचांडी देऊन मारहान केली. परंतु हजर पालकांनी त्यास समजावून सांगीतले व तो तेथून निघून गेला.
दरम्यान सदरील फिर्यादी वरून पोलीस ठाणे युसूफ वडगाव अंतर्गत गु.र.नं.100 /2014 कलम 353,332,323,504 भादंवि अन्वये दत्ता अभिमान्यू शिनगारे रा.आवसगाव, ता.केज, जि.बीड याच्याविरूध्द गुन्हा दाखल होऊन गुन्ह्यांचा तपास पोह/927 एस. वय. वाघमारे यांनी केला. गुन्ह्यांच्या तपासाअंती आरोपी विरूध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या अधारावर तपासीक अधिकारी यांनी मा.न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर केले. प्रकरणाची सुनावणी मा.अपर सत्र न्यायालय 4 थे, अंबाजोगाई श्री एस. के. चौदंते यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती आरोपी विरूध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा.न्यायालयाने आरोपीस एक वर्ष साधा कारावास व 1,000 /- रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 15 दिवस अतिरीक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदरील प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहा. सरकारी वकील एस. व्ही. कुलकर्णी यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोउपनि अर्जुन चौधर यांनी पाहिले.