#Corona
होळी, धूलिवंदन व रंगपंचमीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर…….!
मुंबई दि.27 – कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मिय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोविड- १९ चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी “होळी, धूलिवंदन व रंगपंचमी” चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. यावर्षी दि. २८/३/२०२१ रोजी होळीचा सण आहे. कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. दि. २९/३/२०२१ रोजी धूलिवंदन व २/४/२०२१ रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी या सणानिमीत्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोविड- १९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच होळी/शिमगा निमित्ताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल. याकरीता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी. होळी व धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.
प्रस्तुत मार्गदर्शक सूचनांपेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनांनी यापूर्वी लादले असतील तर ते लागू राहतील अथवा या परिपत्रकानंतर देखील कडक लादू शकतील. मात्र प्रस्तुत मार्गदर्शक सूचना यापेक्षा शिथील करता येणार नाहीत.
दरम्यान कोविड- १९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे लागणार आहे.