शेती
माजी मंत्री अशोक पाटील यांची मांजरा धरणाला भेट !
केज दि.२८ – काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी दि.२७ रोजी मांजरा धरणाला भेट देऊन पाणी परिस्थितीची पहाणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. शेतकऱ्यांनी विजेच्या समस्या मांडल्या तेव्हा त्यांनी तातडीने ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांना बोलून समस्या मार्गी लावण्यात येईल असे सांगितले.
माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी धनेगाव येथील मांजरा धरणाला भेट दिली व यावेळी त्यांनी या भागातील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पाणी आहे पण विजेची मोठी समस्या असल्याचे सांगितले व आम्हाला या भागात युसुफवडगाव वीज केंद्रातुन लाईट असली तरी वाढीव वीज उपकेंद्राला मान्यता मिळावी यासाठी अनेक वेळा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवले आहेत असे सांगितले. मात्र अद्यापही या उपकेंद्रांची क्षमता वाढवण्यासाठी मान्यता मिळाली नाही व यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती केली.
दरम्यान अशोकराव पाटील यांनी राज्याचे ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांना फोन लावला व माझ्या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा मोठा प्रश्न आहे. आपण या वीज उपकेंद्रांची क्षमता वाढवण्यास तात्काळ परवानगी द्यावी अशी विनंती केली. तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील कसलाही विलंब न लावता तातडीने प्रस्ताव पाठवायला सांगा मी करून देतो असा शब्द यावेळी शेतकऱ्यांच्या समोर दिला.
यावेळी युसुफवडगाव वीज उपकेंद्राचे उप अभियंता चव्हाण यांना पाटील यांनी तातडीने प्रस्ताव पाठवा व मला प्रस्ताव पाठवताच कल्पना द्या अशा सूचना दिल्या.