#Cyber Crime
डी डी बनसोडे
April 2, 2021
सावधान……! फेसबुक हॅक करून एका बड्या अधिकाऱ्याच्या नावाने पैशाची मागणी, केजमध्ये प्रकार उघड…….!

केज दि.२ – सध्या सोशेल मीडियामुळे जग जवळ आले आहे. कुठलीच गोष्ट अशक्य राहिलेली नाही. परंतू जेवढ्या सुविधा झाल्या आहेत तेवढेच धोकेही वाढले आहेत. यातून अनेकांची बदनामी, मानहानी यासह ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार तर सर्रास होताना दिसत आहेत. सोशेल मीडिया सुरक्षित राहिला नसून फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्राम सारखे माध्यमांवर हॅकर्स ची नजर असून फसवणुकीचे प्रकार वाढले असून याचा अनुभव नुकताच केज शहरात आला आहे.
बीड जिल्हावाशीयांच्या स्मरणात असेल, मागच्या चार वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर इगवे नावाचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीडमध्ये कार्यरत होते. ते आता मुंबई येथे सेवेत आहेत. मात्र घडले असे की, दि.१ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता फेसबुक मेसेंजर च्या त्यांच्या अकाउंट वरून मला (डी. डी. बनसोडे) कसे आहात ? सध्या कुठे आहात? गूगल पे वापरता का? आणि खात्यावर किती पैसे आहेत? असतील तर 15000/- रुपये पाठवा कारण मित्राचा अपघात झाला आहे आणि दवाखान्यात पैसे भरायचे असल्याने अर्जेंट पैसे पाठवा म्हणून विनंती केली. मात्र तेवढे पैसे नाहीत म्हटल्यावर किमान 3000/- रुपये तरी पाठवा म्हणून 8808646269 हा गूगल पे चा नंबर ही पाठवला. मात्र इगवे यांचा माझा परिचय असल्याने व ते कांही काम असेल तर कॉल करू शकत असल्याने मला शंका आली. त्यामुळे मी त्यांना कॉल केला असता त्यांनी सांगितले की, मी आत्ताच घरी आलो असून तुम्हालाच नाही तर इतर लोकांनाही माझ्या नावाने असेच मेसेज गेले असून कुणीतरी माझे फेसबुक हॅक केले आहे.
दरम्यान त्यांनी ते फेसबुक अकाउंट तात्काळ बंद केले. एवढेच नाहीतर त्यांनी तात्काळ सायबर क्राईम च्या अधिकाऱ्यांशी बोलून ऑनलाइन तक्रारही दाखल केली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र विलंब झाला असता आणि भावनेच्या भरात खर्च इगवे साहेब अडचणीत आहेत असे समजून पैसे पाठवण्याची प्रक्रिया केली असती तर मोठा आर्थिक फटका बसला असता. त्यामुळे सोशेल माध्यमं वापरताना अतिशय काळजी घेण्याची गरज असून कितीही जवळच्या व्यक्तीने अश्या प्रकारे पैशाची मागणी केली अथवा इतर कांही माहिती विचारली तर खात्री करूनच व्यवहार करावा अथवा तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन ज्ञानेश्वर इगवे व सक्रीय न्युज च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
टीप: सोबत मेसेंजर च्या चॅट चा स्क्रीनशॉट जोडण्यात आला आहे.
