परीक्षेसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
नांदेड दि.८ – इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी व परिक्षार्थ्यांना कोवीडची लस टोचून घेणे किंवा आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र ४८ तासासाठी वैध असेल ते जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ता. पाच एप्रिल रोजी संयुक्तपणे जारी केले आहेत.
सदर आदेशाची प्रत जिल्हा परिषद हायस्कूल, समाज कल्याण अंतर्गत आश्रम शाळा, सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत ता. ३० एप्रिलपर्यंत शाळा, कॉलेज बंद आहेत. शासनाच्या महसूल व वनविभाग आपत्ती व्यवस्थापन विभागाने ता. चार एप्रिल 2019 रोजीच्या एका आदेशान्वये तसे कळविले आहे.
तसेच राज्य मंडळ पुणे यांच्या निर्देशानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ता. २३ एप्रिलपासून तर इयत्ता दहावीची परीक्षा ता. २९ एप्रिलपासून सुरु होत आहे. त्यामुळे सदर परीक्षेच्या कामाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी व परीक्षार्थी यांना ब्रेक द चैनमधून सूट देण्यात आली आहे. दहावी- बारावी परीक्षे संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी व परीक्षार्थी यांना कोवीडची लस टोचून घेणे किंवा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल असलेले प्रमाणपत्र ४८ तासासाठी वैध असेल ते जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आदेशात म्हंटले आहे.