दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घ्या, मात्र जूनमध्ये……..!
आ. रोहित पवारांनी मांडले मत

बीड दि.९ – राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. लॉक डाउन बाबत विचारमंथन सुरू आहे तर एकीकडे दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. मात्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी व पालक ऑनलाइन परीक्षेची मागणी करत आहेत. तर ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेच्या बाजूने दिसत आहेत. मात्र यामध्ये सरकारची कोंडी झाली असून नेमके करायचे काय ? हा प्रश्न निर्माण झाल्याने परिक्षे बाबत बैठकावर बैठका सुरू असून यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह मांडल्या जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी चर्चा करून सूचना प्राप्त करून घेतल्या.
यामध्ये “ऑनलाईन परीक्षा म्हणजे घरी बसून नाही तर त्यासाठीही परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. त्यामुळे जूनमध्ये का होईना ऑनलाईनऐवजी नेहमीप्रमाणे ‘ऑफलाईन’ परीक्षा घेणंच योग्य होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केली जाणार नाही. भविष्यात त्यांना अडचणही येणार नाहीत, असं मत आमदार रोहित पवार यांनी मांडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करीत आहेत त्यामध्ये आमदार रोहित पवारांसोबतही त्यांनी चर्चा केली.
आमदार पवार म्हणाले, “शालेय शिक्षणमंत्र्यांनी आमदारांशी ऑनलाईन संवाद साधला. ही बाब प्रशंसनीय आहे. यावेळी आमदार पवारांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, मुलांची शाळा हेच त्यांचं परीक्षा केंद्र असेल त्यामुळं त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावं लागणार नाही. दरम्यान,परीक्षेपूर्वी या प्रक्रियेतील सर्वांचं लसीकरण करावं. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही केंद्र सरकारशी चर्चा करावी. निकाल वेळेवर लावण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान आजच्या परिस्थितीत परीक्षा घेणं ही केवळ शिक्षण विभागाची जबाबदारी नाही तर त्यासाठी इतर सर्व विभाग, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. या बाबत शिक्षणमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.