कोविड रुग्णालयाला आग, चौघांचा मृत्यू,……!
नागपूर दि.10 – नागपूर शहरातील वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागल्याचं समोर आलं आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दि.९ रोजी साधारणत: 8.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
शाॅट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागली तेव्हा या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार चालू होते. आग लागल्यानं सगळीकडे मोठा गोंधळ उडाला. रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या आगीत काहीजण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सदरील घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयातील 20 जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. या रुग्णालयात 50 रुग्ण उपचार घेत होते. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये ही आग लागली आहे. 30 बेडची क्षमता असलेलं हे रुग्णालय होतं, परंतु वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे 50 रुग्णांवर या ठिकाणी उपचार चालू होते.
दरम्यान, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेत त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर संबंधित विभागाकडून लवकरात लवकर चौकशी केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.तर चौकशी नंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे.