मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन बाबत आग्रही,सर्वपक्षीय बैठकीत मांडली भूमिका…….!
मुंबई दि.१० – राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह बनत चालली आहे. त्यातच कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला असून कोरोनावर प्रभावी असणारं रेमडेसीवीर इंजेक्शनही मिळेनासं झाल्यानं लोक संताप करत आहेत. दुसरीकडे सरकारने कडक निर्बंध लावले असून लॉकडाऊनबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेत. त्यातच आता यासंदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत मुख्यमंत्री संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी आग्रही दिसले. महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, राज्यातील परिस्थिती फारच गंभीर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेलं हे मत अत्यंत बोलकं असल्याचं मानलं जात आहे.
कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची असेल तर लॉकडाऊनच गरजेचा आहे. तरुण वर्गाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं असून हे गंभीर आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काल देखील यासंदर्भात बैठक झाली होती, मात्र देवेंद्रजी आपण नव्हता त्यामुळे कोणताही निर्णय झाला नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हटल्याची माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार आहे, असं दिसत आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या ऑनलाईन बैठकीला ठाकरे सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर उपस्थित होते. राज ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनबाबत अंतिम घोषणा काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.