इंदोरीकर महाराज उतरले मैदानात…….!
पुणे दि.12 – किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यासंदर्भात त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. मात्र या खटल्यातून त्यांना न्यायालयाने नुकताच दिलासा दिला असून इंदोरीकर महाराजांनी त्यांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या यूट्यूब चॅनल विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे ते वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युट्युब चॅनल्सच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.
एका वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी त्यांचं कीर्तन प्रसारित करणाऱ्या यूट्यूब चॅनल विरोधात पुण्याच्या स्वारगेट पोलिस ठाण्यात इंडियन आयटी ॲक्ट 66, 66 सी, 43 आय आणि भारतीय दंड विधान कलम 504 व 506 नुसार 16 जुलै 2020 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यापैकी काही यूट्यूब चैनलला पोलिसांकडून नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत.16 जुलै 2020 ला दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा तपास कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे संथगतीने सुरू होता. परंतु, फेब्रुवारी 2021 नंतर या तपासाला वेग आला आणि पोलिसांनी 4 हजार किर्तनाचे व्हिडिओज यूट्यूबवरून डाऊनलोड केले असून 25 ते 30 मोठ्या यूट्यूब चॅनल्सला नोटीस पाठवल्या आहेत.
दरम्यान किर्तनकार इंदोरीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, मी समाजप्रबोधनाच्या भावनेतून कीर्तन करतो, माझं अधिकृत कोणतंही यूट्यूब चॅनल नाही तसेच माझ्या पूर्व परवानगीशिवाय यूट्यूब चॅनलने माझे व्हिडिओ प्रसारित केले आहेत आणि व्हिडिओमध्ये छेडछाड करून माझी बदनामी केल्याचं म्हटलं आहे