#Corona
केज तालुक्यातील ‘ह्या’ गावांत कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक…….!
केज दि.१२ – कोरोनाच्या पहिल्या लाटेत बालेकिल्ला लढवत तालुक्याच्या संसर्गाचे प्रमाण मर्यादेत ठेवण्यात प्रशासनाला यश आलेले होते. मात्र दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाःकार माजवल्याने बीड जिल्ह्यासह केज तालुका त्याला अपवाद राहिला नसून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने मोठ्या प्रमाणावर पाय रोवले असून संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
कोरोनाची पहिली लाट आली तेंव्हा बीड जिल्हा प्रशासनाने कमालीची काळजी आणि खबरदारी घेत अनेक महिने कोरोनाला शिरकाव करू दिला नव्हता. परंतु आजूबाजूच्या सर्वच जिल्ह्यात संसर्ग वाढल्यानंतर बेशिस्त नागरिकांच्या बेफिकीरीमुळे बीडमध्ये शिरकाव झालाच. मात्र जिल्ह्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस आणि महसूल प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत लॉकडाउन मध्ये चांगली कामगिरी करून संसर्गाचे प्रमाण मर्यादेत ठेवले होते.
केज तालुक्याचे तहसीलदार दुलाजी मेंडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कर्मचारी वर्गाने रात्रीचा दिवस करून तालुक्याचे आरोग्य जपले होते. यामध्ये केज तालुक्यात झालेले मृत्यूचे प्रमाण जरी दखलपात्र असले तरी संबंधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांची नोंदणी बाहेर झाली होती. मात्र आधारकार्ड वरील मूळ पत्त्यामुळे ते केजच्या नावावर पडले.
परंतु पहिल्या लाटेत जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. पहिल्या लाटेत एका दिवसातील तालुक्याचा आकडा कधीच 30 ते 35 च्या वर गेला नव्हता. मात्र दुसऱ्या लाटेत केज तालुक्याचे चित्रच बदलून गेले आहे. दिवसेंदिवस संसर्गाचे प्रमाण वाढत चालले असून रविवारी तर तालुक्याने थेट शंभरी पार केली असल्याने तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. यामध्ये विशेषतः ग्रामीण भागात फैलाव सुरू झाला आहे.