बोंबला……! बारावी नापास बोगस डॉक्टर चालवतोय सुसज्ज हॉस्पिटल……!
शिरूर दि.१३ – शिरूर (पुुणे) तालुक्यातील कारेगाव येथील श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनावट नाव व एमबीबीएस चे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून गेली दोन वर्षापासून चालवत असणाऱ्या बनावट डॉक्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. सदरील बोगस डॉक्टर वर रांजणगाव एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेमुद फारुक शेख (रा. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, कारेगाव ता. शिरूर जि.पुणे मूळ गाव पीर बुर्हाणनगर नांदेड ता. जिल्हा नांदेड) या बनावट डॉक्टरला अटक केली आहे. तो बारावी नापास होता. याबाबत डॉ शीतलकुमार राम पाडवी यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे येथे खबर दिली होती. त्यानुसार मोरया हॉस्पिटलच्या बोगस डॉक्टर विरोधात डॉ. उज्वल शशिकांत बाभुळगावकर (वय 57, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केद्र कर्डे, सध्या रा. कर्डे, ता. शिरूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. डॉ. उज्वला शशिकांत बाभुळगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर यांनी दुपारी फोनवरून कळविले की, कारेगाव (ता, शिरूर) येथील मोरया हॉस्पिटल हे बोगस असल्याची माहिती मिळाली असून, त्या ठिकाणी जाऊन खात्री करा असे सांगितले. त्यानुसार मोरया हॉस्पिटल येथे जाऊन खातील केली असता सदर हॉस्पिटलचे डॉक्टर मेहमुद फारुख शेख (रा. पिर बुऱहाणपूर, ता. जि. नांदेड) यांनी महेश पाटील असे खोटे नाव धारण करून रजि. नं. 2015/06/3804 या रजिष्ट्रेशन नंबरचा वापर करून महेश पाटील यांचे MBBS पदवीचे सर्टिफिकिटवर स्वतऋचा फोटो लावून बनावट सर्टिफिकीट तयार करून मोरया नावाचे हॉस्पिटल चालवून त्यामध्ये कोविड सेंटर चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे.
डॉक्टर मेहमुद फारुख शेख या नावाने डॉक्टर डिग्री व रजिष्ट्रेशनचे प्रमाणपत्राचे नोंदणी केलेली नसताना तसेच त्यास वैद्यकीय क्षेत्रामधील कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसताना तो सदर हॉस्पिटल चालवित आहे. मेहमुद शेख याची प्रमाणपत्रे शासन निर्णयानुसार गाह्य नाहीत व मुंबई नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत हॉस्पिटल नोंदणी नसल्याने त्याने महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1961 चे कलम 33(2) नुसार अपराध केला आहे, अशी तक्रार दाखल केली आहे.मेहबूब शेख याने बनावट शिक्के व बनावट आधार कार्ड बनवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालू करण्याकरिता शीतल कुमार राम पडवी यांच्याकडून वेळोवेळी 17 लाख 50 हजार रुपये घेऊन हॉस्पिटल मधून बाजूला काढून त्यांचीही फसवणूक केली असले बाबत शीतलकुमार राम पाडवी यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे.
दरम्यान, मोरया हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्टर असल्याचे समजल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मेहमुद फारुख शेख याला अटक केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव औद्योगिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत पुढील तपास करत आहेत.