शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी……!
मुंबई दि.१४ – शेतकऱ्यांसाठी पावसाचं अन्यसाधारण महत्व आहे. भारतात जवळपास 80% शेती ही पावसावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचं पोट शेतीवर आणि पावसावर आधारलेलं आहे. यातच आता शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आली आहे. यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.
येणारा पावसाळा देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने वर्तवला आहे. राज्यात यंदा 103% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात 5% चा फरक पडू शकतो. त्यानुसार 98% ते 107% यादरम्यान पाऊस पडेल. त्यामुळे यावर्षी देखील सरासरी इतकाच पाऊस पडेल, अशी माहिती स्कायमेट वेदरने ऑनलाईनने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. मागील सलग दोन वर्षी भारतात पाऊस हा समाधानकारक राहिला आहे.
दरवर्षी जून ते सप्टेंबरमध्ये 880 मिलिमीटर पाऊस पडतो. यावेळी 907 मिलीमीटर पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. देशाच्या उत्तर भागात कमी पावसाची शक्यता आहे. तर ईशान्येकडील काही राज्यात देखील कमी पावसाची शक्यता आहे. तर कोकणात देखील यावेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. तर सुरवातीच्या काळात सप्टेंबरमध्ये संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल. त्यानंतर उत्तरेकडील राज्यात पाऊस कमी होईल, असं स्कायमेट वेदरने सांगितलं आहे.
दरम्यान, भारतात पाऊस पडण्यास ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ कारणीभूत ठरतात. यावेळीला ‘ला नीना’ स्थिती तटस्थ असेल स्कायमेटचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस येऊ शकतो.