#Corona
आज पुन्हा केज तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ……..!

केज दि.१४ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने कमी वयाच्या नागरिकांवर आपला मोर्चा वळवला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या संकटात सापडला आहे. मागच्या लाटेत केज तालुक्यात सर्वाधिक रुग्ण हे शहरातील होते. मात्र यावेळेस ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुग्ण दिसून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
तालुक्यातील बनसारोळा, मस्साजोग, आणेगाव आणि उंदरी या गावांना मागच्या चार दिवसांपासून थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यातील युसुफवडगाव, होळ, आडस, चिंचोली माळी सर्कलमधील पळसखेडा, गोटेगाव आणि आडस, युसुफवडगाव या गावांत रुग्ण वाढले आहेत.तर आनंदगाव, सारणी या गावातही कोरोनाचा आलेख वाढत चालला आहे. दि.१३ च्या अहवालात पळसखेड येथे तब्बल 15 तर आडस या गावांत 10 रुग्ण आणि गोटेगाव येथे 7 रुग्ण एकाच दिवशी आढळून आले असून त्यांच्या संपर्कातील लोकांना ट्रेस करणं जिकिरीचे झाले आहे. तर चिंचोली माळी या गावातही मागच्या आठ दिवसांपासून सातत्याने रुग्ण वाढ होताना दिसत आहे. तर मस्साजोग येथे पुन्हा बुधवारच्या अहवालात 7 तर रुग्ण आढळून आले आहेत.
दि.14 च्या अहवालातही होळ, युसुफ वडगाव, तसेच शहरातील विविध भागात लक्षणीय रुग्ण आढळून आल्याने केज तालुका आरोग्य विभागासह सर्वसामान्य लोकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान मंगळवार पेक्षा बुधवारी आलेल्या अहवालात केज तालुक्यात 69 रुग्ण आढळून आल्याने कमी झालेल्या आकड्यामुळे थोडा दिलासा मिळाला. परंतु संसर्गाचे प्रमाण वाढत चालल्याने शहरातील सीसीसी सेंटरचा ताण वाढत चालला असून आणखी कांही पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

