क्राइम
उमरी फाट्यावर चालत्या टेम्पोतून एलईडी बल्ब, ट्यूबचे बॉक्स लांबविले
डी डी बनसोडे
April 14, 2021
केज दि.१४ – मांजरसुंबा महामार्गावरील उमरी फाट्यावर अज्ञात चोरट्यांनी चालत्या टेम्पोवर चढून ताडपत्री फाडून टेम्पोतील ७२ हजार ९७ रुपयांचे एलईडी बल्ब व ट्यूब लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील सालेगाव ( ता. नायगाव ) येथे टेम्पो चालक प्रदीप दिगांबरराव मिसाळे हा वाघोली ( जि. पुणे ) येथून एलईडी बल्प व ट्यूबचे ६८७ बॉक्स आयशर टेम्पोत ( एम. एच. ०४ एफयु ९५४४ ) भरून हैद्राबादकडे निघाला होता. बुधवारी ( दि. १४ ) पहाटे ४ ते ५.३० वाजेच्या दरम्यान टेम्पो हा केज – मांजरसुंबा महामार्गावरील उमरी फाट्यावर आला असता टेम्पोची गती कमी होताच दबा धरून बसलेले चोरटे टेम्पोवर चढले. चालत्या टेम्पोची ताडपत्री फाडून चोरट्यांनी टेम्पोतील ७२ हजार ९७ रुपयांचे एलईडी बल्ब व ट्यूब लंपास करीत पोबारा केला. केजला टेम्पो आल्यानंतर चालकाने टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोवरील ताडपत्री फाटलेली दिसून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. टेम्पो चालक प्रदीप मिसळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिनकर पुरी हे पुढील तपास करत आहेत.