नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, निर्बंध कडक होणार…….!
मुंबई दि.१५ – महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात 15 दिवसांचे कडक संचारबंदी आदेश लागू केले आहेत. परंतु नागरिकांकडून अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे.
राज्यातील संचारबंदीचे नियम आणखी कडक करून किराणा दुकानावर आणि भाजीपाला मार्केटमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी आज किराणा खरेदी आणि भाजीपाल्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ दिसून आली. राज्य सरकार आता महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. नियम शिथिल असल्यामुळे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता राज्य सरकार नियम अधिक कडक करणार आहे. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल पंपावरून इंधन दिले जाईल, या संदर्भात सरकार विचार करत असल्याचीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच स्थानिक प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गरज पडल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात येण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. नागरिक नियमांचं पालन करत नसल्यामुळे आता राज्य सरकार नियम आणखी कडक करून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे.