मोकाट फिरणाऱ्यांची आता खैर नाही, राजेश टोपे यांचा इशारा……!
मुंबई दि.१६ – ज्या रुग्णांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे, ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी नियम पाळले नाहीत तर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करू आणि त्याचा खर्च देखील त्यांनाच करावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय.
आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा, ऑक्सिजन, तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा, असं राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून, प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. सक्रिय रुग्णसंख्या पाहून खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा केला जाणार आहे, असं टोपेंनी सांगितलं.