केज दि.१६ – ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला दुचाकी आडवी लावून ट्रक चालकास मारहाण करीत तिघे जण बळजबरीने ट्रक घेऊन पसार झाल्याची घटना केज – धारूर रस्त्यावरील सानेगुरुजी निवासी शाळेजवळ घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यासाठी अशोक लिलँड कंपनीचा ट्रक ( एम. एच. २४ एफ ९७१२ ) हा ऊस वाहतूक करीत होता. तर या ट्रकचा चालक श्रीनिवास गोरख जाधव ( रा. लिंबाळा ( दव तांडा ) ता. औसा जि. लातुर ) हा माजलगाव तालुक्यात तोडलेला ऊस ट्रकमध्ये भरून कारखान्यावर खाली केल्यानंतर १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास परत केजमार्गे माजलगावकडे निघाला होता. केज – धारूर रस्त्यावरील सानेगुरुजी निवासी शाळेजवळ ट्रक गेला असता दुचाकीवर आलेल्या अनोळखी तिघांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली. त्यांनतर या तिघांनी ट्रक चालक श्रीनिवास जाधव याच्या तोंडावर चापटा मारल्या. त्यांनी बळजबरीने ट्रक ताब्यात घेऊन १ लाख २० हजार रुपये किंमतीचा ट्रक घेऊन पसार झाले. अशी फिर्याद ट्रक चालक श्रीनिवास जाधव याने दिल्यावरून अज्ञात लोकांविरुद्ध केज पोलिसात १५ एप्रिल रोजी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे पुढील तपास करत आहेत.