आपण वापरात असलेला मास्क योग्य आहे का?
बीड दि.१७ – देशात कोरोनाची प्रकरणं सातत्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. यामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दरम्यान पुन्हा एकदा मास्क घालण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. मात्र कोणते मास्क कुणासाठी जास्त योग्य असेल? कोणते जास्त इफेक्टिव्ह असेल? हे आज जाणून घेऊया.
सर्जिकल मास्क
बाजारामध्ये सर्जिकल मास्क (Surgical Mask Benefits In Marathi) उपलब्ध आहेत. या प्रकारच्या मास्कचा आपण केवळ एकदाच वापर करू शकतो. सर्जिकल मास्कचा वापर करून झाल्यानंतर त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आवश्यक आहे.मास्कचा उपयोग केल्यानंतर ते बंद कचऱ्याच्या डब्यात फेका. जेणेकरून संसर्ग होणार नाही. तर सामान्य सर्जिकल मास्क जवळपास ८९.५ टक्के कणांना थांबवण्यात सक्षम आहेत. आरोग्य कर्मचारी याचा वापर जेथे कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे आणि फिजिकल डिस्टेंसिंग खूप अवघड आहे तिथे करू शकतात.तसेच ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ज्याची प्रकृती खराब आहे, ज्यांना कोरोनाचे लक्षण आहेत किंवा जे संक्रमितांची देखरेख करत आहेत असे लोकही याचा वापर करू शकतात.
फॅब्रिक मास्क (कपड्याचा मास्क)
DIY म्हणजे घरगुती मास्क, जे आपण स्वतः तयार करू शकतो. पण ते मास्क दोन किंवा तीन लेअरचे असावे. सिंगल लेअरचा मास्क धोकादायक ठरू शकतो. तुम्ही कोणत्या कापडाच्या मदतीनं मास्क तयार केलंय, यावर घरगुती मास्कची गुणवत्ता अवलंबून आहे. हल्ली मेडिकलमध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे कपड्यांचे मास्क उपलब्ध आहेत. सदरील मास्क सामान्य लोकांसाठी असुम कामाच्या ठिकाणी, ग्रॉसरी स्टोर, बस, शेअर टॅक्सी आणि गर्दीच्या ठिकाणी याचा वापर करता येऊ शकतो. तसेच कोरोना संक्रमित परिसरातील लोक, असे लोक ज्यांच्यात कोरोनाचे लक्षण आहेत आणि जेथे फिजिकल डिस्टेंसिंग अवघड आहे तिथेही.
N95 मास्क
N95 मास्क कोरोना व्हायरससारख्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सर्वात चांगला मास्क मानला जातो. हा सहजपणे तोंड आणि नाकावर फिट होतो आणि बारीक कणांनाही नाक किंवा तोंडात जाण्यापासून रोखतो. हे हवेतील ९५ टक्के कणांना रोखण्यात सक्षम आहे. यामुळे याचे नाव N95 आहे. सामान्य लोक, आरोग्य कर्मचारी हॉस्पीटल, कामाच्या ठिकाणी, ग्रॉसरी स्टोर, बस, शेअर टॅक्सी आणि गर्दीच्या ठिकाणी वापरू शकतात.
व्हॉल्व मास्क
रुमालानं किंवा अन्य मास्कनं चेहरा झाकल्यानं काही वेळ गुदमरल्यासारखं वाटतं. त्यामुळे लोक हा मास्क वापरतात. या मास्कमध्ये जास्त उष्णता जाणवत नाही. याशिवाय या मास्कचा फारसा उपयोग नाही. सर्दी, खोकला अशी लक्षणं असल्यास त्या व्यक्तीनं हा मास्क वापरणं टाळावं. जेणेकरून इतर कोणत्याही निरोगी व्यक्तीला संसर्गाची लागण होणार नाही.