लसीचा दुसरा डोस नाही घेतला तर ? पहिला आणि दुसरा डोस वेगवेगळ्या लसीचा घेता येतो का ?
मुंबई दि.१८ – महाराष्ट्रात कोरोनाच्या लसींचा तुटवडा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मी लसीचा पहिला डोस घेतला आहे, आणि आता लसीचा दुसरा डोस मला कसा मिळणार? तो नाही मिळाला तर त्याचा आरोग्यावर काही परिणाम होईल का? किंवा मी उपलब्ध असलेल्या दोन वेगवेगळ्या कंपनीची लस घेऊ शकतो का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाले असतील. त्यामुळे तज्ञांच्या मदतीने आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहोत.
कोरोनाची पहिला डोस घेतला, परंतु दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांच्या कालावधीत उपलब्ध झाला नाही किंवा घेता आला नाही तर याचा आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का?
तज्ञांच्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला लस घ्यायला उशीर जरी झाला तरी, त्याचा प्रकृतीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. परंतु दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याचबरोबर अशी परिस्थिती महाराष्ट्रात नसल्याचा दावा देखील महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे (DMER) संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे.
जर लसीचा दुसरा डोस मिळालाच नाही किंवा घेतला नाही तर काय होईल?
तज्ञांच्या माहितीनुसार कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशा अँटीबॉडीज शरीरात तयार होणं गरजेचं आहे. जर दुसरी लस घेतली नाही तर, शरीरात पुरेशा अँटीबॉडीज तयार होणार नाहीत. त्यामुळे विषाणूशी लढण्यासाठी शरीरात लसींचा जेवढा प्रभाव हवा तेवढा प्रभाव राहणार नाही. थोडक्यात सांगायचे तर केवळ एक लस प्रभावी ठरणार नाही.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोव्हिशील्ड लस कोरोनापासून 71 टक्के सुरक्षा देते. पण ही सुरक्षा लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मिळते.
लसीचा दुसरा डोस मिळत नसल्यास कुठे तक्रार करावी?
जर नागरीकांना लसीचा दुसरा डोस मिळत नसेल तर त्यांनी संबंधित लसीकरण केंद्राला या बद्दल माहिती द्यावी. तुम्ही पहिली लस ज्याठिकाणी घेतली आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला दुसरी लस मिळणे अपेक्षित आहे. तेव्हा त्याच केंद्रात जाऊन तुम्ही लसीची चौकशी करावी. तसेच लस घेण्यासाठी नोंदणी किंवा अपॉईनमेंट घेण्यासाठी वापरण्यात आलेल्या कोविन (Co-WIN) ऍपवर देखील तुम्हाला तक्रार करता येईल.
पहिला डोस एका लसीचा घेतला, आणि दुसऱ्या डोस दरम्यान ती लस उपलब्ध नसेल, त्याजागी दुसरी लस उपलब्ध असेल, तर दुसरा डोस वेगळ्या लसीचा घ्यावा का?
पहिल्या लसी दरम्यान जर समजा तुम्ही कोव्हीशिल्डची लस घेतली आणि दुसऱ्या डोस दरम्यान ती लस उपलब्ध नसेल तर, त्याजागी कोव्हॅक्सीन उपलब्ध असेल तर, त्या कंपनीचा डोस घ्यावा का? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर, तुम्हाला असं करता येणार नाही. हे आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांच्या म्हण्यानुसार, “लसीचे डोस दोन वेगवेगळ्या कंपनीचे घेता येणार नाहीत. पहिला डोस एका कंपनीचा (उदा.कोव्हीशिल्ड) आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीचा (उदा.कोव्हॅक्सीन) अशी पद्धत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे करू नये.”