आता 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना दिली जाणार कोरोनाची लस……!
नवी दिल्ली दि.१९- सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. याआधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. नरेंद्र मोदींनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली.