ऐकावं ते नवलच…..! कोंबड्या अंडे देत नाहीत म्हणून पोल्ट्री चालकाने केली पोलीसात तक्रार……..!
पुणे दि.२१ – आतापर्यंत कौटुंबिक वाद, खून, मारामाऱ्या, दरोडे ,चोरी या सारख्या प्रकारामुळे लोकांना पोलीस स्टेशन गाठताना आपण पाहिलं आहे. पण पुणे तिथे काय उणे असं म्हणतात. आता कोंबड्या अंडी देत नाही म्हणून पोलिसात तक्रार दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही तक्रार बघून आता पोलीसही चक्रावले आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथे लक्ष्मण भोंडवे नावाच्या व्यक्तीची पोल्ट्री आहे. त्यांनी कोंबड्या करिता 11 एप्रिलला एका कंपनीचे खाद्य आणलं होतं. हे खाद्य कोंबड्यांना दिल्यानंतर पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांनी मागील आठ दिवसांपासून अंडी देणं बंद केलं आहे. त्यानंतर पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणं बंद झालं असल्याचं प्राथमिक तपासणीत दिसून येत आलं. त्यानंतर पोल्ट्री चालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.
नवीन कंपनीचे खाद्य कोंबड्यांनी खाल्यांने पोल्ट्री चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा लक्ष्मण भोंडवे यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आहे. लक्ष्मण भोंडवे यांनी केलेली तक्रार बघून आता पोलिसही चक्रावले आहेत. याप्रकरणात नक्की कोणाची चौकशी करायची, असा सवाल आता पोलिसांना पडला आहे.
दरम्यान, लॅबमध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीनुसार नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणं बंद झाल्याचं समजलं आहे, त्यामुळे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाबाबत तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.