चक्कर येऊन एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू…….!
नाशिक दि.२१ – वाढत्या कोरोना संसर्गाला तोंड देत असतानाच नाशिकसमोर अजून एक संकट उभं राहिलं आहे. चक्कर येऊन मृत्यू होणाऱ्या घटना पुन्हा समोर येत आहे. एकाच दिवशी तब्बल 11 जणांचा भोवळ येऊन मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे चक्कर येऊन मृत्यू होत असल्यानं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अचानक चक्कर येऊन मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात 11 वर गेला आहे. मागील आठवड्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता. 15 एप्रिलला एका दिवसात 9 जणांना चक्कर येऊन प्राण गमवावे लागले होते, तर त्याआधी 4 जण मृत्युमुखी पडले होते. म्हणजेच दोन आठवड्यात 24 जणांना भोवळ येऊन जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाचा घरीच चक्कर येऊन मृत्यू झाला होता.
नाशिक शहराचं तापमान वाढून 40 अंशाच्या पार पोहोचलं आहे. त्यामुळे त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, या नव्या संकटामुळे वैद्यकीय क्षेत्रातही चिंतेचं वातावरण तयार होत आहे. चक्कर येणं, मळमळ होणं यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला नाशिक शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे.