क्राइम
सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या……..!
पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
डी डी बनसोडे
April 23, 2021
केज दि.२३ – गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे का घेऊन येत नाहीस या कारणावरून सासरी होत असलेल्या छळास कंटाळून एका विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील डोणगाव माहेर असलेल्या मयत शोभा रामहरी गायकवाड हिचा दहा वर्षांपूर्वी पिंपळगाव येथील रामहरी बालु गायकवाड यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्य झाली. मात्र शोभा या महिलेस तिचा पती रामहरी गायकवाड, सासरे बालु गायकवाड, दिर किशोर गायकवाड, मेहत गायकवाड, सासू सविता गायकवाड, नणंद लता कुटे यांनी गाडी घेऊन येण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून तगादा लावला. ती पैसे घेऊन येत नसल्याने छोट्या छोट्या गोष्टीवर शोभा हीचा सासरच्या मंडळींनी सतत शिवीगाळ आणि मारहाण करून छळ सुरू केला. शेवटी छळास कंटाळून शोभा गायकवाड हिने २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आपल्या सासरच्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. २३ एप्रिल रोजी अंबाजोगाई येथील रुग्णलयात उत्तरीय तपासणी नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शोभा गायकवाड यांची आई तारामती भुसारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती रामहरी गायकवाड, सासरे बालु गायकवाड, दिर किशोर गायकवाड, मेहत गायकवाड, सासू सविता गायकवाड, नणंद लता कुटे या सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.