‘हे’ इंजेक्शन दिल्यानंतर ऑक्सिजन ची गरज कमी, मात्र…….! डॉ.तात्याराव लहाने यांची प्रतिक्रिया

मुंंबई दि.२४ – केंद्र सरकारकडून झायडस कॅडिलाच्या ‘विराफिन’ औषधाला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.कोरोना गंभीर रुग्णांसाठी ‘विराफिन’ औषधाला देशातील शिखर संस्था असलेल्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. सात दिवसांत कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. यावर राज्याच्या टास्कफोर्सचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी या औषधाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे चिंताजनक स्थितीत असलेल्या देशातील 250 रुग्णांना विराफिन हे औषध देण्यात आलं आहे. त्यापैकी 10 रुग्ण मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील होते. या रुग्णांना विराफिन हे इंजेक्शन दिल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी झाल्याचं डॉ. लहाने यांनी सांगितल आहे. हे इंजेक्शन देऊन भागत नसून इतर उपचार सुरू ठेवावे लागतात. इतर औषधांसोबत हे इंजेक्शन दिले तर परिणाम दिसून येतात. विराफिनचे इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांमध्ये रिकव्हरी वेगाने दिसून आली. पण हे संकट एकट्या विराफिन औषधाने संपत नसल्याचं लहानेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे केली होती. डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे.