दारूची तलफ जीवावर बेतली, सहा जणांचा मृत्यू…….!

यवतमाळ दि.२४ – दारुची तलफ भागवण्यासाठी दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे. यातील तिघांचा घरी तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यक्तिरिक्त सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दारुच्या दुकांनानाही केवळ ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच यवतमाळमध्ये दारु न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
मृतांमध्ये दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे, गणेश शेलार यांचा समावेश आहे. यातील तीन जणांचा घरीच मृत्यू झाला होता. तर इतर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे समोर आले आहे.