#Lockdown
विनाकारण बाहेर पडाल तर मिळेल ‘प्रसाद’……..!

केज दि.२८ – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवरण्यात प्रशासन मेटाकुटीला आले आहे. विनंती केली, आवाहन केले तरी लोक बाहेर पडल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तालुक्यात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिलेल्या वेळेत कामे न करता रस्त्यावर गर्दी दिसून येत असल्याने बुधवारी तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी आक्रमक पवित्रा घेत मोकाट फिरणा ऱ्यांना हातात काठी घेऊन ‘प्रसाद’ दिल्याने बऱ्यापैकी गर्दी कमी झाली.
कांही अत्यावश्यक सेवा सकाळी 11 पर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे खरेदीसाठी लोक केज शहरात मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. मात्र 11 वाजून गेल्यानंतर दुकाने जरी बंद झाली तरी लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसतात. नियमितपणे पोलीस, तहसिल व नगरपंचायत च्या वतीने लोकांना विनाकारण बाहेर फिरू नका म्हणून आवाहन करण्यात येत असले तरी ऐकतील ते लोक कसले.
मात्र बुधवारी तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी हातात काठी घेऊन तर नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी स्पीकरवरून लोकांना आवाहन करत मेन रोडने फेरी मारली. कांहीजण घरी गेले मात्र जे निगरगट्ट होते ते तसेच फिरत असल्याचे दिसले. मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांसमवेत स्वतः तहसीलदार उभे राहिले अन विनाकारण फिरणाऱ्या कांही लोकांना जेंव्हा प्रसाद दिला तेंव्हा कुठे रस्ता बऱ्यापैकी निर्मनुष्य झाला. त्यामुळे लोकहो विनाकारण बाहेर पडाल तर प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा……..!
