क्राइम
तुरीचे भुसकट जाळून शेतकऱ्यास काठीने बेदम मारहाण…….!
केज दि.२८ – तुरीचे भुसकट का जाळले ? अशी विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यास पाच जणांनी जातीवाचक शिवीगाळ करीत काठ्याने व लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील मस्साजोग येथे बुधवारी ( दि. २८ ) सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी केज पोलिसात पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मस्साजोग येथील शेतकरी अशोक भगवान सोनवणे ( वय ४० ) यांनी त्यांच्या शेत सर्वे नं. ६५/यु/५, व ७७/६/ए या शेतात तुरीचे भुसकट ठेवले होते. २८ एप्रिल रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपी नारायण सखाराम धस, परमेश्वर नारायण धस, अशोक नारायण धस, वैजनाथ भागवत धस, रामेश्वर भागवत धस ( सर्व रा. सांगवी ता. केज ) यांनी त्यांचे तुरीचे भुसकट जाळून टाकले. त्यामुळे अशोक सोनवणे यांनी तुरीचे भुसकट का जाळले ? अशी विचारणा केली असता केली वरील आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करीत काठीने व लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. अशोक सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण धस, परमेश्वर धस, अशोक धस, वैजनाथ धस, रामेश्वर धस या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे पुढील तपास करीत आहेत.