#Lockdown
केज शहरात लॉक डाउन चा फज्जा…..! सगळंच उघडं…..!
केज दि.२९ – संपूर्ण राज्यात असलेले लॉक डाउन चे नियम केज शहराला लागू आहेत की नाही ? असा प्रश्न पडला आहे. ज्या अत्यावश्यक सेवेतील आस्थापना सकाळी 11 पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश आहेत त्या बरोबर एखादं दुसरं दुकान वगळता इतरही सर्वच दुकाने उघडल्या जात असल्याने शहरात लॉक डाउन चा पुरता फज्जा उडाला आहे.
अत्यावश्यक सेवेतील कांही दुकानांना सकाळी 11 पर्यंत नियमांचे काटेकोरपणे पालन करून उघडे ठेवण्यास परवानगी आहे. मात्र शहरातील मेन रोड, कानडी रोड, मंगळवार पेठ सह अंतर्गत वसाहतीतील अपवाद वगळता सर्वच दुकाने उघडी आहेत. यामध्ये जनरल स्टोअर्स, शु मार्ट, कपड्याची दुकाने, पान टपऱ्या, हॉटेल्स यासह इतरही दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. तर कांही दुकानदारांनी एक शटर उघडून सेवा सुरू केल्याचे दिसत आहे.
भाजीपाला विक्री तर दररोज सुरू असून वकिलवाडी, बसस्थानक परिसरात खुले आम भाजीपाला विक्री सुरू असल्याने प्रचंड गर्दी होत आहे.त्यामुळे केज शहरात कोरोना विषयक नियमांचा पुरता फज्जा उडाला असून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान केज तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत जात असून याचे गांभीर्य दुकांदारांसह प्रशासनालाही राहिलेले दिसत नाही.