केज दि.३० – महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. बेड आणि औषधी मिळत नाहीत म्हणून कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र केज तालुक्यातील लोकांना याचे कांहीच सोयरसुतक राहिलेले नसून कोरोना नियमांची रोजच पायमल्ली होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. यामध्ये आठवडी बाजाराने तर कहर केला असून प्रचंड गर्दी होत आहे.
शहरात मंगळवारी आणि शुक्रवारी असे दोन भाजीपाल्याचे आठवडी बाजार भरतात. एक वर्षा पूर्वी पर्यंत ह्या दोन बाजारावर लोकांच्या भाजीपाल्याच्या गरजा भागातही होत्या. मात्र जसे लॉक डाउन जाहीर झाले तसे काय झाले माहीत नाही मात्र लोकांच्या गरजा मात्र वाढल्या. लॉक डाउन काळात शहरात ठिकठिकाणी भाजीपाला विक्री होऊ लागली अन कोरोनाचा धोकाही वाढला. लोक रोजच हातात पिशवी घेऊन बाहेर पडू लागले अन तेवढ्याच प्रमाणात शेतकरीही भाजीपाला घेऊन शहरात येऊ लागले. त्यांना कितीही सांगितले, धाक दाखवला तरी कांही फरक पडलेला नाही.
कोरोनाची दुसरी लाट आली आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्यात लॉक डाउन जाहीर केला. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टींवर निर्बंध आणलेले आहेत. मात्र केजचा आठवडी बाजार याला अपवाद आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी मोठा बाजार भरत असून तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर लोक भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. यामध्ये बहुतांश विक्रेते आणि खरेदीदार विनामास्क बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. कुठल्याच प्रकारचे सोशेल डिस्टनसिंग तर दिसतच नाही. यामध्ये भाजीपाला विक्री बरोबर इतरही दुकाने थाटली जात असल्याने प्रचंड गर्दी होत असून कोरोना विषयक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. त्यामुळे केजच्या आठवडी बाजाराला कोरोना घाबरतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान आज तर मुख्य रस्त्यावर एवढी मोठी गर्दी झाली होती त्यामुळे सुमारे अर्धातास ट्रॅफिक जाम झाल्याने वाहनांची लांबच्या लांब रांग लागली होती. त्यामुळे केज शहरात कसल्याच प्रकारची प्रशासनाची आणि पोलिसांची भीती नागरिकांच्या मनात राहिलेली नसून मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग वाढत चाललेला आहे.