केज दि.२ – केज – कळंब रोडवर मागच्याच महिन्यात सुरू झालेल्या कमल पेट्रोलियम या रमेश आडसकर यांच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोल पंपावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत १ लाख ४९ हजार १६७ रुपयांचे १७०४ लिटर डीझल चोरून नेल्याची घटना घडली असून पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केज- कळंब राज्य रस्त्यावर रमेश आडसकर यांच्या मालकीचा कमल पेट्रोल पंप मार्च मध्ये सुरू करण्यात आला आहे. सदर पंपावर दि.१ मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी टाकी मधून पाईपद्वारे डिझेल चोरी केल्याची घटना घडली. यावेळी वॉचमनला संशय आल्याने त्याने आवाज देताच चोरटे १० टायरच्या ट्रक मधून डिझेल घेऊन पसार झाले. मात्र काढलेल्या डिझेल पैकी पंपाच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्याच्या जवळ ३५ लिटरचे ३४ कॅन व ६० लिटरचे ३ कॅन घेऊन जाता न आल्याने तिथेच राहिले. त्यामुळे टाकीतून काढलेल्या ३९१५ लिटर पैकी चोरांनी १७०४ लिटर डिझेल चोरून नेले.
दरम्यान पंपाचे मॅनेजर गोविंद देशपांडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. केज तालुक्यात यापूर्वी देखील धारूर रोडवरील सुयश पेट्रोल पंपावरून अडीच लाखांच्या पेट्रोल ची चोरी झाली होती. त्यामुळे पंपावर डल्ला मारणारी एखादी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याबाबत पोलिसांनी या रॅकेटचा शोध घेण्याची मागणी पेट्रोल पंप चालकाकडून होत आहे.