#Social
पाणी असूनही झाडे गेली वाळून…….!
केज दि.३ – शहरातील मोठ्या प्रमाणावर झाडांनी सुशोभित असलेल्या एकमेव सरकारी कार्यालयातील झाडे केवळ निष्काळजीपणामुळे वळून चालली आहेत. बोअर ला पाणी असूनही केवळ मोटार नादुरुस्त असल्याने ही वेळ आलेली आहे.
शहरातील मुख्य रस्त्याला लागूनच सार्वजनिक बांधकाम कार्यालय तसेच शासकीय विश्रामगृह आहे. कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दर्शनी भागात तत्कालीन उपविभागीय अभियंता श्री. सराफ यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून विश्राम गृह सुशोभित केलेले आहे. मात्र त्यांच्यानंतर सदरील झाडांची निगा न राखल्यामुळे मागच्या दोन वर्षांपूर्वी सदरील परिसरातील सात आठ झाडे जळून गेली.
त्यानंतर सदरील परिसरात एक बोअर घेतले असून त्याला पाणीही चांगले आहे. मात्र मागच्या कांही महिन्यांपासून सदरील बोअर वरील मोटारीचा कांहीतरी साधारण बिघाड झालेला असून संबंधित प्रमुखाने त्याकडे लक्ष दिले नसल्याने परिसरातील बहुतांश मोठमोठी झाडे जळून गेली आहेत. मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली आंब्याची, अशोकाची झाडे पुर्णतः वाळून गेल्याने परिसर रुक्ष झाला आहे.
दरम्यान संबंधित प्रकाराबद्दल विचारणा केली असता कोरोनामुळे मोटार दुरुस्त करण्यासाठी कुणी मेकॅनिक येत नसल्याचे उत्तर मिळाले. परंतु हा प्रकार निव्वळ निष्काळजीपणामुळे झाला असून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा उर्वरित झाडे पुर्णतः जळून जाण्यास वेळ लागणार नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार संबंधित कार्यालय प्रमुख असणार आहेत.