फॅमिली डॉक्टर्सना कोरोना लढ्यात सहभागी करून घेतलं जाणार…….!
मुंबई दि.८ – महाराष्ट्र कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापासूनचं कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्याला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात फॅमिली डॉक्टर्सना सहभागी करुन घेतलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून फॅमिली डॉक्टर्सशी संवाद साधतील, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील लोक फॅमिली डॉक्टरवर जास्त विश्वास ठेवतात. फॅमिली डॉक्टर्सवर नागरिकांचा विश्वास असतो. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी फॅमिली डॉक्टर्सची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी तयार करण्यात आलेली टास्क फोर्स त्यांना मार्गदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.
राज्यातील तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकारने आता आणखी एक प्रयत्न सुरु केलाय. राज्यातील विभागवार फॅमिली डॉक्टरांशी टास्क फोर्स संवाद साधणार आहे. यामधून कोरोनामध्ये प्राथमिक उपचार काय केले जावे याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. कारण समान्य माणूस हा आपल्या फॅमिली डॉक्टरवर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळ फॅमिली डॉक्टरना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करुन घेतलं जाणार आहे.
दरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर महाराष्ट्रातील फॅमिली डॉक्टरांची मोट बांधण्याची जबाबदारी देण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या माध्यमातून या फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. रविवारी पहिल्यांदा मुंबईतील डॉक्टरांशी संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर रविवारीच रत्नागिरी आणि सिंदुदूर्गमधील दोन हजार फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधला जाणार आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे हा संवाद साधला जाणार आहे. येत्या एक महिन्याच्या कालावधीत राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना कोरोनाच्या लढ्यात सहभागी करुन घेतलं जाणार आहे. फॅमिली डॉक्टरांना कोरोना लढ्यात सहभागी करुन घेण्याचा हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचं विनायक राऊत म्हणाले.