नात्यापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे, कर्मचाऱ्याने केली आईवर कारवाई……!
अहमदनगर दि.८ – महाराष्ट्र सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ब्रेक द चेनचे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. काही जण कळत नकळत निर्बंध मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. शासकीय कर्मचारी निर्बंध मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. अहमदनगरमधील पाथर्डी नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्यांनं थेट आईवरचं कारवाई करुन नात्यांपेक्षा कर्तव्यनिष्ठा महत्वाची आहे हे दाखवून दिलं आहे.
पाथर्डी नगरपरिषदेमध्ये रशीद शफी शेख हे कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आई एका रस्त्यावर भाजीपाला विक्री करत होत्या. नगरपरिषदेचं पथक शहरातून फिरत असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यामुळे रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या आईवर रशीद शेख यांनी कारवाई केली.
सर्व भाजीपाला जप्त करत नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकला. शहरात एका पालिका कर्मचाऱ्याने आपल्या आईवर कारवाई करत कर्तव्याला प्राधान्य दिले. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.