क्राइम
पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट भिडल्या प्रकरणी केज पोलिसांनी केला गुन्हा दाखल……..!
केज दि.10 – तालुक्यातील उमरी येथे शेतीच्या वादातून नाली खोदान्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तसेच पुन्हा पोलीस स्टेशन आवारातही त्यांच्यात हाणामारी झाल्याचे निदर्शनास आले. मात्र दोन्हीही गटाने अद्याप फिर्याद दिलेली नसली तरी पोलिसांनी ठाण्याच्या आवारात येऊन दंगा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
उमरी येथे भाऊराव चाळक आणि शेख अली अकबर यांची शेजारी शेजारी जमीन आहे. दि.९ मे रोजी दुपारी ३:०० वा. च्या दरम्यान या दोन्ही गटात शेतातील जुन्या भांडणाची कुरापत काढून व शेतातील नाली खोदन्याच्या कारणा वरून दोन्ही गट परस्पररांशी भिडले. यात दगड, विटा आणि लाठ्या काठ्यानी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात एकाच्या उजव्या हाताची करंगळी तुटली तर एकाचे दात पडले आहेत. तसेच अन्य एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. सदरील माहिती पोलिसांना मिळताच उमरी येथे पोलीस पथक पोहोचले आणि त्यांनी हस्तक्षेप करत भांडण सोडवले.मात्र नंतर दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यासाठी केज पोलीस ठाण्यात समोरा समोर येताच पुन्हा त्यांच्यात तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली. यामध्ये एकाच्या बोलेरो गाडीवरही दगडफेक करण्यात आली.
दरम्यान या प्रकरणी दोन्हीही गटाकडून फिर्याद देण्यात आलेली नाही. मात्र पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन हाणामारी केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली.