केज शहरातील दुकानांवर दंडात्मक कारवाई……..!
केज दि.१२ – कोरोनाच्या उद्रेकामुळे लागू असलेल्या कडक लॉकडाऊनमधून मंगळवारी सकाळच्या सूट देण्यात आल्याने केज शहरात किराणा दुकानासह इतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती. तर किराणा दुकानावर गर्दी झाल्याने तीन किराणा दुकानासह इतर पाच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मेडिकल आणि दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवून कडक लॉकडाऊन करण्यात आले. तर केज शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट करून दंडात्मक कारवाईची मोहीम तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी राबविली होती. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य होते. मात्र मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी सकाळी ७ ते १० पर्यंत किराणा दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मंगळवारी सकाळच्या सत्रात सूट देण्यात आल्याने तहसीलदार दुलाजी मेंडके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, तलाठी लहू केदार, पोलीस नाईक धनपाल लोखंडे, नगरपंचायतीचे स्वछता निरिक्षक असद खतीब, अनिल राऊत, सय्यद अन्वर, आयुब पठाण, अमर हजारे, सय्यद अतिक, शेख आझाद, वट्टे, हाजबे, पोटे, कळे यांनी शहरात फिरून रस्त्यावरील आणि किराणा दुकानावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. तर सूचना देऊन किराणा दुकानावर गर्दी दिसून आल्याने तीन किराणा दुकानदारांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड केला. इतर पाच दुकानदारांना नियमांचे उल्लंघन करून दुकान उघडल्यावरून दंडात्मक केली. शहरातील आठ दुकानदारांकडून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर मंगळवार पेठ भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
दरम्यान आज दि.१२ रोजीही शहरातील कानडी रोड, मेन रोड येथील दोन कपड्यांची दुकाने तर एका अन्य दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.