पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरार, दोघा सख्ख्या भावांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून…..…!

बीड दि.19 – क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पर्यवसान दोन भावंडांच्या खुनात झाले. कुऱ्हाडीचे घाव घालून दोन भावांना निर्घृणपणे संपविण्यात आले. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि. १७) रात्री ११ वाजता तालुक्यातील नागापूर(खु.) येथे घडली.
राम आत्माराम साळुंके (५०) व लक्ष्मण आत्माराम साळुंके (४७) अशी मयतांची नावे आहेत. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके याने दोन्ही भावांना शिवीगाळ केली होती. तेंव्हा हा वाद आपसात मिटला होता; परंतु सोमवारी परमेश्वरने दोघांना फोनवरून शिवीगाळ केली. याबाबत त्याला समजवण्यासाठी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके गेले होते. यावेळी भररस्त्यात त्यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शव जिल्हा रुग्णालयात पाठविले. मंगळवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. परमेश्वर साळुंकेविरुद्ध पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे.