#Lockdown
केज प्रशासनाचा दणका, 250 लोकांवर कारवाई, सव्वा लाखाचा दंड वसूल…….!
केज दि.18 – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने कडक अंमलबजावणी चे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार केज तालुक्यात पोलीस, महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाने कठोर पावले उचलली असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई सुरू केली आहे. यामध्ये एकाच दिवशी 258 वाहनांवर कारवाई करून सुमारे 1 लाख 18750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन स्वतः ठाण मांडून बसले आहेत. तर पोलीस कर्मचारी व नगरपंचायत चे कर्मचारी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करत आहेत. यामध्ये मास्क नसलेले, विना परवाना बाहेर येणाऱ्या लोकांना कारवाईचा बडगा दाखवत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.तर ज्या आस्थापना नियमांचे उल्लंघन करतील त्यांनाही आर्थिक दंड करण्यात येत असल्याने शहरातील सर्व आस्थापना कडकडीत बंद दिसत आहेत.
दरम्यान पोलीस निरीक्षक त्रिभुवन हे चौकात स्वतः ठाण मांडून बसले असून यामध्ये कोणाचीही गय केली जात नाही. आज दि.19 रोजी सकाळीही चौकात सर्व कर्मचारी सतर्क असून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंडके, पोलीस निरीक्षक प्रदिप त्रिभुवन आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.