#Corona
कोविड सेंटर मध्ये दाखल महिला रुग्णांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर……!
बीड दि.१९ – कोविड सेंटरमध्ये दाखल कोविडबाधित महिला रुग्णांशी आक्षेपार्ह वर्तन, विनयभंगाचे प्रकार होत असल्याचं समोर आलं आहे. तशा तक्रारीसुद्धा संबंधितांकडून झाल्यात. कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश नसतो, त्यामुळे आत काय चाललंय, काय नाही, कशाचाच थांगपत्ता नातेवाईकांना लागत नाही. याचा गैरफायदा पुरुष कर्मचाऱ्यांकडून घेतला जात असल्याचं निदर्शनाला आल्यानंतर शासन जागं झालं असून, सदरबाबत मार्गदर्शक सूचना जारी करून काटेकोर पालनाचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात कोविड १९ या आजाराचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढत आहे. सदर संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने कोविड पॉजिटीव्ह रुग्णांवर कोविड केंद्रामध्ये आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. सदर कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली (SoP) तयार करण्याच्या अनुषंगाने सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी वरील समितीने शिफारस केल्यानुसार खालीलप्रमाणे मानक कार्यप्रणाली (SoP) निश्चित करण्यात आली आहे.
यामध्ये कोविड- १९ सेंटर मधील आंतररुग्ण महिलांकरिता (अपवादात्मक परिस्थिती वगळता) स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे. महिला कक्षेत पुरुष सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येऊ नये. अपवादात्मक परिस्थितीत पुरुष सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आलेली असल्यास त्यांनी महिला सहाय्यकासोबतच महिला कक्षेत प्रवेश करावा. कोणत्याही पुरुष कर्मचारी यांनी महिला परिचारिका किंवा एखाद्या स्त्री सहाय्यकासोबत महिला वाँडाँत दरवाज्यावर नॉक करुनच प्रवेश करावा.
महिलांच्या कोविड १९ निवारण कक्षात रुमची साफसफाई तसेच बेड क्लिनिंग किंवा इतर साफसफाई करण्याकरिता तसेच पॅन्ट्री सुविधा देण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
महिला कक्षामध्ये रात्रीच्या वेळी महिला सहाय्यक असणे आवश्यक आहे. महिला कक्षेत पुरुष सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येऊ नये. अपवादात्मक परिस्थितीत पुरुष सहाय्यकाची नियुक्ती केली असल्यास पुरुष सहाय्यकानी महिला सहाय्यकासोबतच महिला कक्षेत प्रवेश करावा. कोविड १९ सेंटर मधील आंतररुग्ण महिलाकरिता कोणत्याही वैद्यकीय चाचण्या उदा. युसएसजी (U.S.G.), इकोकार्डीिओलॉजी (Echocardiology), एक्सरे (X-ray), सी. टी. स्कॅन (CT.Scan) ईसीजी (ECG), ईईजी (EEG) करताना त्याठिकाणी स्त्री सहाय्यकाची उपस्थिती असणे आवश्यक आहे. संबंधित महिला कक्षाच्या इन्चार्ज सिस्टरनी याबाबत जातीने लक्ष देऊन काटेकोरपणे पालन करावे.
तसेच महिला कोविड १९ कक्षामध्ये साफसफाईचे कामकाज नियोजीत वेळापत्रकानुसार तसेच विहित वेळेतच पार पाडावे सदर कामकाज संपल्यानंतर संबंधीत कर्मचारी महिला कक्षेत रेंगाळत रहाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. महिला कोविड- १९ सेंटरमध्ये प्रवेश करण्याच्या व बाहेर जाण्याच्या सर्व मार्गावर किंवा दरवाज्यावर सी सी. टी व्ही असणे अत्यंत आवश्यक आहे. कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे. कोविड सेंटर मध्ये प्रवेश करणा-या व्यक्तीच्या नावाची तसेच वेळेची नोंद संबंधीत नोंदवहीमध्ये सुरक्षा रक्षकांनी घ्यावी जेणेकरुन भविष्यात आवश्यकतेनुसार महिला कोविड सेंटर मध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होईल. महिला कोविड- १९ सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्सेस, हाऊसकिपिंग, सुरक्षा रक्षक तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी आपल्या परीने महिला रुग्णाच्या सुरक्षेची आवश्यक ती दक्षता घ्यावी. महिला कोविड सेंटरमध्ये कोणतीही व्यक्ती संशयास्पद रितीने फिरताना किंवा टेहळणी करताना आढळल्यास त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिका-यांना व प्रशासनाला या बाबतची माहिती दयावी. या बाबत महिला कोविड सेंटरमध्ये काम करणा-या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना वरिल सुचना स्वतंत्रपणे देण्यात याव्यात व सजग रहाण्याचे निर्देश देण्यात यावेत, वरिल कार्यपध्दती प्रसुत झालेल्या कोविडग्रस्त महिला रुग्णांच्या कक्षाला लागू राहतील. महिला कोरोना- १९ कक्षामध्ये महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोणत्याही महिलेला तक्रार करणे सुलभ होईल. तक्रारीकरिता स्वतंत्र हेल्पलाईन नंबर असणे आवश्यक आहे. व त्याची संपूर्ण माहिती दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. तसेच अशिक्षीत महिलाना तक्रार निवारण समितीबाबत सिस्टर इंजार्च यांनी माहिती देणे आवश्यक आहे. महिला कोविड १९ सेंटर मधील कक्षामध्ये २० रुग्णाकरिता स्वतंत्र १ बाथरूम व १ संडास सुस्थितीत असणे आवश्यक आहे.त्याचबरोबर महिला कोविड कक्षामध्ये पाण्याचा पुरवठा तसेच विजेची २४ तास सुविधा असणे आवश्यक असून कोविड कक्ष हवेशीर असावा. कोविडबाधित गर्भवती महिलेला आंतररुग्ण असताना सेंटरमध्ये काही त्रास उद्भवल्यास जवळच्याच रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी तात्काळ रुग्णवाहीकेची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी व अशा स्त्री रुग्णाबरोबर एक महिला सहाय्यक असणे आवश्यक राहील याची सिस्टर इन्चार्ज यानी दक्षता घ्यावी.
तर कोविड रोगामुळे मृत झालेल्या महिलांचा मृतदेह कपडयात बांधताना पुरुष कर्मचारी यांचेबरोबर महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच मृतदेह दुसरीकडे नेण्याकरिता पुरुष कर्मचारी यांचेबरोबर महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. कोविड सेंटरमध्ये दर्शनी भागावर (panic alarm button) पॅनिक अलार्म बटन आवश्यक आहे. तसेच त्याची माहिती कोविंड सेंटरमधील महिलांना देण्यात यावी. कोविड सेंटरमध्ये गरोदर महिलासाठी कक्षाच्या सुरवातीलाच आरक्षित खाटा ठेवणे आवश्यक आहे. कोविड सेंटरमध्ये अग्निशामक यंत्रणा असणे आवश्यक आहे. इत्यादी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.