#Social
केज येथील रिलायन्स पेट्रोल पंपाकडून रुग्णवाहिकेस दररोज 50 लिटर इंधन मोफत……..!
डी डी बनसोडे
May 20, 2021
केज दि.20 – सध्या भारतात कोविड सारख्या महाभयंकर महामारीने थैमान घातले असून याचे पडसाद ग्रामीण भागात जास्त दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व सध्या सर्वचजण आर्थिक अडचणीत सापडला असून गरजूंना मदत म्हणून रिलायन्स कंपनीने कोविंड रुग्णांसाठी प्रत्येक रिलायन्स पेट्रोल पंपावरून पन्नास लिटर इंधन दररोज मोफत देण्याचे ठरविले आहे.
कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्ण वाहिनी साठी येणारा अवाढव्य खर्च कमी व्हावा या हेतूने रिलायन्स पेट्रोलियम कंपनीच्या माध्यमातून अशा रुग्णवाहिकाना आता मोफत इंधन पुरवले जाणार आहे.याचा शुभारंभ केज येथे बीड रोडरील रिलायन्स पेट्रोल पंपावर ठाकूर विजयसिंह दिख्खत यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक गरजू रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज भासत आहे, परंतु यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनीने कोरोणा ग्रस्त रुग्णांना घेऊन जाणाऱ्या खाजगी व शासकीय रुग्णवाहिका यांना दररोज दिवसाला पन्नास लिटर फक्त याप्रमाणे मोफत इंधन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सदरील योजना 30 जून 2021 पर्यंत आहे.सुरुवातीला हा उपक्रम मोठ्या शहरात राबवण्यात येत होता परंतु सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही जास्त असल्याने खरी गरज ग्रामीण भागाला आहे. त्यामुळे हा उपक्रम ग्रामीण भागातही रिलायन्स कंपनीने सुरु केला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात केज मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी रिलायन्स पेट्रोल पंपाचे संचालक विजयसिंह दिख्खत तसेच रिलायन्स पेट्रोल पंपाचे मॅनेजर गणेश केजकर, निखिल बिक्कड, श्रीराम शेटे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. करपे, एस. बी. थोरात, सहाय्यक अधीक्षक श्रीकृष्ण नागरगोजे, तंत्रज्ञ डी. आर. तपसे यांची उपस्थिती होती.