बीडमध्ये झाले मृतदेहाचे मौखिक शवविच्छेदन…….!
बीड दि.22 – येथील एका खाजगी रुग्णालयात कोरोना वरील उपचार सुरु असताना आत्महत्या केलेल्या कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे बीडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आयसीएमआरच्या निर्देशांनुसार मृतदेहाची कोणतीही चिरफाड न करता मौखिक निरीक्षणांवरून हे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान कोरोनाग्रस्तांचे शवविच्छेदन करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी .
कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन केले जात नाही, तर मृतदेहावर थेट अंत्यसंस्कार केले जातात. आयसीएमआर ने देखील कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे थेट शवविच्छेदन टाळावे अशाच सूचना दिलेल्या आहेत. मात्र शुक्रवारी बीडच्या जिल्हा रुग्णालयात असाच एक कठीण प्रसंग उद्भवला.
बीडच्या एका खाजगी रुग्णालयात कोरोनासाठी उपचार सुरु असताना एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून अहवाल देण्याची विनंती बीड शहर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाला केली. कोरोनाग्रस्त मृतदेहाचे शवविच्छेदन करावे की नाही यावरून बराच काथ्याकूट झाला. महाराष्ट्रात यापूर्वी कोठेच असे शवविच्छेदन न झाल्याने नेमके काय करावे यावर बराच वेळ खल झाल्यांनतर आयसीएमआरच्या सुधारित निर्देशांप्रमाणे मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. गिरीश गुट्टे यांच्या मार्गदर्शनात डॉ.
फरीदा यांनी केले.
आयसीएमआरने कोरोनाग्रस्तांच्या शवविच्छेदनासंदर्भाने निर्देश जरी केलेले आहेत. यात कोरोनाग्रस्तांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मृत्यू घोषित करून उपचाराच्या कागद्पत्रआधारे मृत्यूचे कारण द्यायचे आहे. मात्र अपघात, आत्महत्या अशा न्यायवैद्यक प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यकच असेल तर शक्यतॊ शवविच्छेदन टाळावे आणि करावेच लागले तर पोलिसांनी मृतदेहासोबत मृतदेहाचे वेगवेगळ्या अंगाने काढलेले फोटो पाठवावेत, त्या फोटोंचे आणि मृतदेहाचे बाह्य निरीक्षण करून आणि मृत्यू व्यक्ती संदर्भाने वैद्यकीय उपचार, मृत्यूवेळची शारीरिक परिस्थिती याची माहिती घेऊन त्यावरून मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा शवविच्छेदन अहवाल द्यावा असे सांगितले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मृतदेहाची चिरफाड करू नये असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे,
दरम्यान महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार जगात यापूर्वी जर्मनीने काही कोरोनाग्रस्त मृतदेहांचे शवविच्छेदन केले होते. त्यांनतर भारतात बेंगळुरू येथे डॉ . दिनेश राव यांनी ऑकटोबर २०२० मध्ये एका कोरोनाग्रस्त मृतदेहाचे शवविच्छेदन केले होते. त्यावेळी कोरोनाचे विषाणू मृतदेहाच्या तोंडात १४ ते १८ तास राहतात असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यामुळे पुन्हा कोणी शवविच्छेदन केलेले नव्हते. आजचे मौखिक शवविच्छेदन हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार आहे.