#Corona
कोरोना संसर्गाबाबत आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना..….!
नवी दिल्ली दि.26 – देशात कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासात देशात अडीच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संक्रमण आणि त्यांच्या उपचारांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाचे संक्रमण हवेच्या माध्यमातून होत असून कोरोना संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने, शिंकल्याने आणि बोलल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. बोलताना, खोकताना ,शिंकल्यावर बाहेर येणाऱ्या ड्रॉपलेट्समधून कोरोनाचा सर्वाधिक फैलाव होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी जून महिन्यात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गाइडलाइनमध्ये असे म्हटले होते की, प्रामुख्याने कोरोना संक्रमित व्यक्ती जेव्हा इतरांच्या संपर्कात येतो तेव्हा कोरोनाचा फैलाव होतो.
काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस हवेतून पसरतो यावर शिक्का मोर्तब करण्यात आला होता. कोरोना संक्रमित व्यक्तीच्या शिंकल्या, खोकल्याने आणि बोलल्यामुळे कोरोना व्हायरस हवेत १० मीटर पर्यंत जाऊन निरोगी व्यक्तीला देखील कोरोनाची लागण होऊ शकते,असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते.
कोरोनाची कमी किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णाला दिवसातून तीन ते पाच वेळी रिकाम्या पोटी इव्हर्मेक्टिन औषध दिले जाऊ शकते.गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना इव्हर्मेक्टिन औषध दिले जाणार नाही.कमी किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर करण्याची आवश्यकता नाही.कोरोना संक्रमाणानंतर रुग्णाला सात पेक्षा जास्त वेळा ताप आला असेल, खोकल्यासारखी लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टेरॉइड देऊ शकता.कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला जाणार नाही.
दरम्यान आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या गाइडलाइनमध्ये इव्हर्मेक्टिन औषध समावेश केला नव्हता. त्याचप्रमाणे पहिल्या गाइडलाइनमध्ये कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपीचा समावेश करण्यात आला होता. मात्र नव्या गाइडलाइननुसार प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचारातून वगळण्यात आली आहे.