केज दि.२६ – जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून चिकन सेंटर उघडे ठेवणाऱ्या चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून केज – कळंब रस्त्यावरील सुर्डी फाटा येथे इरफान चांद शेख ( रा. सुर्डी ता. केज ) याने किम्मत नावाचे चिकन सेंटर उघडे ठेवून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा संभव आहे हे माहीत असताना त्याने ही कृती केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस शिपाई बालासाहेब ढाकणे यांच्या फिर्यादीवरून इरफान शेख याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.
शिरूरघाट येथे टेम्पो चालकाची आत्महत्या
केज दि.२६ – कोरोनामुळे टेम्पोचे हप्ते कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या ३० वर्षीय टेम्पो चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घटना केज तालुक्यातील शिरूरघाट येथे घडली. लक्ष्मण हरिदास घोडके असे आत्महत्या केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
शिरूरघाट येथील लक्ष्मण हरिदास घोडके ( वय ३० ) या तरुणाने हप्त्यावर टेम्पो खरेदी केला होता. मात्र कोरोना आजारामुळे लॉकडाऊन लागू झाले. त्यामुळे वाहतुकीला बंदी असल्याने टेम्पोचा धंदा पडला. आता कोरोनाचे संकट कधी जाईल आणि टेम्पोचे हप्ते कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या लक्ष्मण घोडके याने नैराश्यातून टोकाची भूमिका घेतली. हनुमंत नामदेव लोंढे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन लक्ष्मण घोडके याने आत्महत्या केली. ही घटना २५ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या पूर्वी घडली. मयताचा भाऊ बळीराम हरिदास घोडके यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.