
केज दि.२६ – लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून केज शहरात दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांकडून आणि विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवरून कडक करण्यात आलेल्या लॉकडाऊनची केज शहरात कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस, नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक असद खतीब, अतिक सय्यद, आझाद शेख, सुरेश लांडगे हे बुधवारी मंगळवार पेठ, धारूर रोड, कळंब रोड, मुख्य रस्त्यावर फिरत असताना नियमांचे उल्लंघन करून भांडे आणि कपड्याची सहा दुकाने उघडी दिसून आली. त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तर विना मास्क फिरणारे ८ जण निदर्शनास आल्याने त्यांना ही प्रत्येकी २०० रुपये दंड करून त्यांनी १४ हजार रुपये दंड वसूल केला.
होळ शिवारातून ट्रॅक्टरमधील ३० हजाराचे साहित्य चोरले
केज दि.२६ – अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरमधील बॅटऱ्या, डिझेल आणि जॅक असे ३० हजार ६१ रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना केज तालुक्यातील होळ शिवारात घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील वकिलवाडी भागातील ट्रॅक्टर चालक अजीज तुराबोद्दीन सय्यद हे होळ शिवारातील शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करीत होते. मध्यरात्री २ वाजेपर्यंत नांगरणी करून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची १० हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या, ५ हजार रुपये किंमतीचा जॅक, ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीतील १५ हजार ६१ रुपयांचे १६६ लिटर डिझेल असे ३० हजार ६१ रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना २४ मे रोजी मध्यरात्री २ ते सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली. अजीज सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.