घरासमोर मुरूम टाकू नका म्हणल्यावरून तरुणास बेदम मारहाण
केज दि.१ – घरासमोर मुरूम टाकू नका, पावसाचे पाणी घरात घुसेल असे म्हणाल्यावरून तरुणास दगडाने व लाथाबुक्याने बेदम मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील लव्हुरी येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लव्हुरी येथील विष्णू दिगांबर चाळक ( वय ३० ) हा तरुणास ३१ मे रोजी रात्री नऊ वाजता घरासमोर मुरूम मुरूम टाकू नका, पावसाचे पाणी घरात घुसेल असे म्हणाल्यावरून कैलास सुरेश चाळक, सुरेश गोविंद चाळक, राजेश भास्कर चाळक, श्रीराम अशोक चाळक, सर्जेराव लक्ष्मण चाळक, राहुल सर्जेराव चाळक यांनी शिवीगाळ करून दगडाने व लाथाबुक्याने बेदम मारहाण करून मुक्कामार दिला. त्याच्या नातेवाईकांना ही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. विष्णू चाळक यांच्या फिर्यादीवरून कैलास चाळक, सुरेश चाळक, राजेश चाळक, श्रीराम चाळक, सर्जेराव चाळक, राहुल चाळक या सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करत आहेत.
घरासमोर उभ्या केलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीची चोरी
केज दि.१ – तालुक्यातील कोरेगाव येथे घरा समोर उभ्या केलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चोरीची घटना घडली असून केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष राजेंद्र तांदळे याने कोरेगाव येथे दि.३० मे रोजी त्याच्या घरासमोर उभ्या करून ठेवलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली क्र. (एम एच- २३/सी-६५६२ आणि एम एच-२३/सी- ५८७९) या सुमारे ३ लाख रु. किंमतीच्या ट्रॉली या गावातीलच संतोष अभिमान घुले व त्याचे तीन साथीदार यांनी चोरून नेल्या. सदर प्रकरणी संतोष तांदळे यांच्या तक्रारी नुसार केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७३/२०२१ भा.दं.वि. ३७९ आणि ३४ नुसार संतोष अभिमान घुले व अन्य तीन साथीदारांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धनपाल लोखंडे हे करीत आहेत.