#Vaccination
बीड जिल्ह्यात शनिवारी होणार फक्त दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण……!
डी डी बनसोडे
June 3, 2021
बीड दि.3 – कोविड- १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दिव्यांगांना कोविड १९ लसीकरणाकरीता अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या बाबीचा विचार करुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे पत्र दिनाक २५/५/२०२१ नुसार बीड जिल्हयातील ४५ वर्षावरील दिव्यांगाकरीता खास लसीकरण सत्राचे आयोजन दिनांक ५/६/२०२१रोजी करण्यात आले असल्याची माहिती बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिव्यांगाच्या लसीकरण सत्रा दिवशी फक्त दिव्यांगाचे लसीकरण करण्यात येईल, दिव्यांग वगळता इतर कोणालाही लस देण्यात येऊ नये. लसीकरणाची वेळ ९ ते ५ राहील. विशेष म्हणजे दिव्यांगांना online appointment घेण्याची आवश्यकता नाही. समाजकल्याण विभागामार्फत समन्वयाकरीता केंद्रनिहाय समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे, त्यांची दिव्यांगाना बोलावण्या करीता मदत घेण्यात येणार आहे. तसेच लसीकरण सत्र फक्त ४५ वर्षावरील दिव्यांगांकरीता राहणार असून लसीकरणाकरीता येते वेळी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राची प्रत व आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, एसआरटी मेडिकल कॉलेज सह प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये केज तालुक्यातील आडस, बनसारोळा, चिंचोली माळी, राजेगाव, युसूफ वडगाव, विडा या ठिकाणी प्रत्येकी 150 तर केज उपजिल्हा रुग्णालयात 350 आणि नांदूर घाट येथे 300 दिव्यांगाना लसीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान दिव्यांग व्यक्तींना लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास रविंद्र शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.बीड संपर्क क्रमाक :- ८६६८२६२७९५, ९५४५४५६५५५, डॉ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बीड. संपर्क क्रंमाक :- ७७२०८३९१५५ या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेण्याचे आवाहन बीड जिल्हा दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लाड यांनीही केले आहे.