21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस मिळणार…….!
नवी दिल्ली दि.७ – भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचं संकट आणि केंद्र सरकारने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. देशाने या संकटाचा अनेक आघाड्यांवर सामना केला आहे. गेल्या दीड वर्षात आपण हेल्थ केअर स्ट्रक्चर वाढवण्यात आले आहे. मेडिकल ऑक्सिजनची या देशात कधीच एवढी कमतरता जाणवली नव्हती. त्यासाठी सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांना कामाला लावण्यात आल्या. जगातील कानाकोपऱ्यातून जे काही आणणं शक्य होईल ते आपण आणून या संकटाचा सामना केला, असं मोदी म्हणाले.
दरम्यान येत्या 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील तर त्यांना 25 टक्के लसी उपलब्ध असतील. खासगी रुग्णालयात 150 रुपये भरून लस घेता येईल, असं मोदींनी स्पष्ट केलं.